Article

नमिता मुंदडा यांनी केले विधानसभेत जाण्याचे स्वप्न पुर्ण

गेल्या चाळीस वर्षापासून बीड जिल्हा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी हळूहळू सरकत आला आहे. २०१९ ची निवडणूक हा त्याचा परमोच्च बिंदू ठरला. जिल्ह्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी उमेदवारी निवडीवर आपला प्रभाव टाकला. सत्तेचे वारे कोणत्या दिशेने वाहते आहे याचा अचुक अंदाज असलेल्या मुंदडा कुटूंबियांनी मुंडे भाऊबंदकीचा लाभ उठवला. जेष्ठ नेते शरद पवार यांनी बीडच्या जाहीर सभेत उमेदवारी घोषित करूनही नमिता मुंदडा यांनी कमळ आपलेसे केले आणि विधानसभेत पोहचण्याचे मतदारसंघातील सूत्र यशस्वीपणे सोडवले. भारतीय जनता पक्षाने आपल्या विद्यमान आमदाराचे तिकीट कापून नमिता मुंदडा यांच्या पारड्यात वजन टाकण्यात राष्ट्रवादीला अडचणीत आण्ण्याचे मनसुबे होते हे लपून राहीलेले नाही.

बीड जिल्हयातील केज मतदारसंघावर मुंदडा परिवाराचा मोठा प्रभाव आहे. या मतदारासंघातून दिवंगत माजी मंत्री विमलताई मुंदडा या पाचवेळा आमदार झाल्या होत्या. एकेकाळी राष्ट्रवादीतील वजनदार नेत्यापैकी असलेल्या विमलताई मुंदडा यांचा राजकीय प्रवास भारतीय जनता पक्षातून सुरू झाला होता. आता त्यांची स्नुषा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आल्याने एका अर्थाने हे वर्तुळ पुर्ण झाले आहे. मुंदडा कुटूंबियांचा मतदारसंघातील जनसंपर्क, गट निर्माण करण्यात आलेले यश आणि भाजपाचे खोल नेटवर्क यामुळे स्नुषा नमिता मुंदडा यांचा विजय निश्चित झाला. परदेशातून उच्चशिक्षण प्राप्त केलेल्या नमिता मुंदडा यांच्या या विजयाने विमलताईंचा वारसा पुढे नेण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. व्यवसायाने आर्किटेक्चर असणाऱ्या नमिता यांना जिंकून येण्यासाठी पती अक्षय मुंदडा आणि सासरे नंदकुमार मुंदडा यांनी भक्कम पाठबळ दिले. माहेरी कोणताच राजकीय वारसा नसणाऱ्या मूळच्या सांगलीच्या असणाऱ्या नमिता लोखंडे या लग्नानंतर नमिता मुंदडा झाल्या. वडिल अशोक लोखंडे हे नोकरीस मुंबईस असल्याने त्यांचे शिक्षण मुंबईतच पुर्ण केले. लग्नानंतर पती आणि सासऱ्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकीय धडे गिरवण्यास सुरूवात केली.  त्यांनी २०१४ ची विधानससभेची निवडणुक पहिल्यांदा लढवली. भाजपच्या संगीता ठोंबरे यांच्या विरोधात लढलेल्या या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारवा लागला होता. हा कटू अनुभव पचवून नमिता पुन्हा एकदा जोमाने कामाला लागल्या, काहीही करून यावेळी त्यांना आमदारपद पदरी पाडून घ्यायचेच होते. ऐनवेळेला पंकजा मुंडेच्या मार्गदर्शनाखाली लढवलेल्या या निवडणुकीत ३२ हजार ९८३ मतांनी त्यांचा विजय झाला. राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज साठे यांच्यास‍ह एकुण बारा उमेदवार या निवडणुकीला उभे हाते. त्यांची खरी लढत ही राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज साठे यांच्याबरोबरच होती.

चढाओढीच्या राजकारणात नमिता मुंदडा यांना जरी यश मिळाले असले तरी हे यश टिकवून ठेवण्यासाठीसाठी मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. पाण्यच्या मूळ प्रश्नांवर तोडगा शोधून मतदारसंघ बांधावा लागणार आहे.

 

758 views
Ads

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

cool good eh love2 cute confused notgood numb disgusting fail