Article

पालकत्व हमी योजना हवीच

‘पालकत्व हमी योजना’ अशा स्वरूपाच्या योजना अथवा पालकत्व निभावण्याचे कायदे आणण्याची आवश्यकता आहे. असं मला मनस्वी वाटतं. बाल हक्क कायद्यामध्ये बालकांना त्याग करण्याचे गुन्हे घडले तर त्याग करणाऱयांना कोणतीच शिक्षा नाही अथवा दंड नाही. जी काही शिक्षा आहे ती नाममात्र स्वरूपाची आहे. त्याला शिक्षा म्हणायचं का हाही प्रश्न आहे. अर्थातच नसेल सांभाळायला जमत तर टाका बालगृहात, अशी आपल्याकडे व्यवस्था आहे. बऱ्याच दत्तकविधान करणाऱ्या बालगृहात जेव्हा अशी रस्त्यावर सापडलेली बाळे येतात आणि त्यांच्या पालकांची ओळख पटलेली असून सुद्धा ही बाळे दत्तक देण्याच्या नादात येथील संस्था इथं पालकांचे समुपदेशन, अथवा कोणताही कायदेशीर धाक पालकांना दाखवत नाही.

चक्क मूग गिळून गप्प बसतात. मागे एकदा अशाच एका संस्थेच्या विरोधात बाल कल्याण समितीने पवित्रा घेतल्यावर संस्थेने पालक आमचे ऐकत नाही, अशी सबब देऊन बाळ दत्तक जाणं किती महत्वाचं आहे, असा उलटा पाठ त्या समिती सदस्यांना पढवला; आणि हेही वर्षोनुवर्षे चालूय. एका अर्थाने पालक म्हणून त्या बाळाला सांभाळायला नालायक असतीलही आणि बऱ्याच अंशी असतातच तर ते सिद्ध करून आजपर्यंत कोणत्याही निष्क्रिय, बेजबाबदार पालकांना कोणतीही शिक्षा कोणत्याच पातळीवर होत नाही. एकूण काय तर पालकत्व निभावण्यासाठीचे सामाजिक,प्रशासकीय पातळीवर समुपदेशनाद्वारे सुद्धा सशक्तिकरण केले जात नाही. जन्मदात्र्या आई वडीलांविना, कुटुंबाविना मूल आयुष्यभर कोणकोणत्या दिव्यातून जातात, याची साधी कल्पना या बेजबाबदार पालकांना देण्याची तसदीही कुणी घेत नाही. अथवा कोणतीही शिक्षा, सामाजिक दाह त्या बेजबाबदार आईवडिलांना सोसावा लागत नाही.

ही सापडलेली जुळी मुलं नक्कीच कुमारीमातेची नसावी. ज्यांना कुटुंबाचे आर्थिक, नात्यांचे भार सोसवत नाही अशांनी या जीवांना दावणीला लावले आहे. या आईवडिलांना भलेही बाळांना सांभाळायचे नसेल तर त्यांनाही कठोर शिक्षा होण्याची नितांत आवश्यकता आहे; आणि ती शिक्षा दोघांना व्हावी. स्त्रियांवर बाळंतपण लादलं जातं, हे तरी अर्धसत्य आपण किती दिवस स्विकारणार आहोत? लैंगिक शिक्षण, फॅमिली प्लॅनिंग, नात्यांचे रागरंग जर बाईनेच समजूनच घेतले नाही तरी ती वर्षोनुवर्षे पुरुषसत्ताक व्यवस्थेवर अवलंबून राहून अबलाच राहील आणि मग अशी अनेक बाळे जागोजागो गल्लोगल्ली दिसतील. मला नेहमी वाटत अनाथालयातील बालकांना वांझोटी सहानुभूती पलीकडे काहीही मिळत नाही. अनाथालये काढण्यापेक्षा जबाबदार समर्थ पालक, जबाबदार नागरिक निर्मितीच्या दृष्टीने का या सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते काम करत नाहीत? देणगीदारांना आकर्षित करण्यासाठी केवळ भिकेची झोळी पसरली, दोन अश्रू ढाळले म्हणजे त्या बालकांचे पोषण होते हा समज केवळ त्या बाळाच्या शारीरिक पोषणापूरता मर्यादित राहतो. त्यात ममत्व, प्रेम, शैक्षणिक, वैचारिक विकासाचे हे पैलू दुर्लक्षित राहतात, हे आपणाला सोयीस्करपणे समजून घ्यायचे नसतात. कुमारीमातेची बाळे आता जन्माला येण्याचे प्रमाण फार कमी झाले आहे याउलट लग्नातील बाळांनी अनाथालयात गर्दी केलीय आणि दुर्दैवाने हीच बाळे दत्ताकविधान प्रक्रियेत जास्त आहेत. याची कारणं शोधायला तेवढा वेळ आहे कुणाला? सोशल मीडियावर ही दोन बाळे अशाच वांझोट्या सहानुभूतीच्या लाटेवर फिरत आहेत. पण असं कोणीही म्हणायला तयार होत नाही की या कृत्याच्या मुळावरच मलमपट्टी करण्याची आवश्यकता आहे. आज आपल्याकडे सर्व गुन्ह्यांवर शिक्षा आहे मग बेजबाबदार पालकांना का नाही शिक्षा दिली जात? का पर्यायी व्यवस्था आहे म्हणून तो गुन्हाच नाही?

-गायत्री पाठक

90 views

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

cool good eh love2 cute confused notgood numb disgusting fail